१९७५ साली क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा भरविण्यास सुरुवात झाली. यंदा १२ वा वर्ल्ड कप खेळला जात आहे. प्रत्येकाला आपल्या देशाच्या खेळाडूंनी वर्ल्ड कप उंचावतानाचे चित्र बघायला आवडते. आपल्या देशाचं नाव वर्ल्ड कपवर कोरलं जाणं ही अभिमानाची गोष्ट आहे. आतापर्यंत प्रसिद्धी आणि देशवासीयांची भावनिक साथ यासोबतच प्रत्येक विजेत्या संघाला आयसीसीकडून बक्षीस रक्कमही मिळाली आहे. तुम्हाला माहित आहे का ही रक्कम किती होती ? चला तर सविस्तरपणे जाणून घेऊया १९७५ पासून २०१९ पर्यंत वर्ल्ड कप विजेत्यांना किती रक्कम दिली याबद्दल…
(१९७५ ते २००७ पर्यंतच्या वर्ल्ड कपमधील बक्षिसांच्या रक्कमा आजच्या तारखेच्या पौंड किंवा डॉलरच्या मुल्यानुसार कन्व्हर्ट केल्या आहेत.)
१) १९७५ – पहिला वर्ल्ड कप १९७५ साली इंग्लडमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यात संपूर्ण स्पर्धेसाठी एकूण ७ लाख ७५ हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या वेस्ट इंडिज संघाला ३ लाख ४४ हजार रुपये तर उपविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला १ लाख ७२ हजार रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली.
२) १९७९ – १९७९ सालचा वर्ल्डकप इंग्लंडमध्येच आयोजित करण्यात आला होता. त्या विश्वचषकात एकूण २२ लाख ३१ हजार रुपयांची बक्षिसे होती. विजेत्या वेस्ट इंडिज संघाला ८ लाख ६१ हजार रुपयांचे तर उपविजेत्या इंग्लंड संघाला ३ लाख ४४ हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
३) १९८३ – १९८३ साली इंग्लंडने पुन्हा एकदा वर्ल्ड कपचे आयोजन केले होते, ज्यात भारतीय संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. या वर्ल्ड कपमध्ये एकूण ५७ लाख रुपयांची बक्षिसे होती. त्यात विजेत्या भारतीय संघाला १७ लाख २३ हजार रुपये तर उपविजेत्या वेस्टइंडीज संघाला ८ लाख ६१ हजार रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
४) १९८७ – भारत आणि पाकिस्तान यांच्या वतीने संयुक्तरित्या १९८७ चा वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. त्यात जवळपास ८५ लाख ५८ हजार रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षीस वाटण्यात आली. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला २५ लाख ८५ हजार रुपयांचे तर उपविजेत्या इंग्लंड संघाला १२ लाख ९२ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
५) १९९२ – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त वतीने १९९२ साली वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. त्यात जवळपास १ कोटी रुपयांहून अधिक रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या पाकिस्तान संघाला १७ लाख ६७ हजार रुपयांचे तर उपविजेत्या इंग्लंड संघाला ८ लाख ८३ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
६) १९९६ – भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त आयोजनात १९९६ ची विश्वचषक स्पर्धा पार पडली. एकूण स्पर्धेत १ कोटी ७२ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे वाटण्यात आली, त्यात विजेत्या श्रीलंका संघाला २५ लाख ८६ हजार रुपयांचे तर उपविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला १२ लाख ९३ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
७) १९९९ – १९९९ साली परत एकदा इंग्लंडला विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत एकूण ६ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे वाटण्यात आली, त्यात विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला २ कोटी ५ लाख रुपयांचे तर उपविजेत्या पाकिस्तानला १ कोटी २ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
८) २००३ – दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनियाच्या संयुक्त वतीने २००३ ची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत २५ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली होती. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला जवळपास १३ कोटी ७२ लाख रुपये तर उपविजेत्या भारतीय संघाला ५ कोटी ४९ लाख रुपये रक्कमेचे बक्षीस मिळाले.
९) २००७ – २००७ चा वर्ल्ड कप वेस्टइंडीजमध्ये पार पडला. या स्पर्धेत ३४ कोटी ३० लाख लाख रुपयांहून अधिक रक्कमेची बक्षिसे प्रदान करण्यात आली. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला जवळपास १५ कोटी ३७ लाख रुपयांचे तर उपविजेत्या श्रीलंका संघाला ६ कोटी ८६ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
१०) २०११ – भारत, श्रीलंका आणि बांगलादेशच्या वतीने २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ५० कोटी रुपयांची बक्षिसे दिली गेले. विजेत्या भारतीय संघाला जवळपास २२ कोटी ३० लाख रुपयांचे तर उपविजेत्या श्रीलंकेला १० कोटी २९ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले.
११) २०१५ – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या वतीने २०१५ च्या वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ६५ कोटी रुपयांची बक्षिसे वाटण्यात आली. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला २५ कोटी रुपये तर उपविजेत्या न्यूझीलंड संघाला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.
१२) २०१९ – २०१९ चा वर्ल्डकप न्ग्लंडमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत जवळपास ६९ कोटी ४० लाख रुपयांची बक्षिसे वाटली जाणार आहेत. विजेत्या संघाला जवळपास २७ कोटी ७५ लाख रुपये तर उपविजेत्या संघाला १३ कोटी ९० लाख रुपये मिळतील.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.