आज आषाढी न?
म्हटलं तुकोबाची भूमिका केलेला एखादा फ़ोटो देऊ टाकून आणि त्या निमित्ताने पुन्हा लोकांना आठवण करून देऊया आपल्यात असलेल्या विविधांगी/ चतुरस्र वगैरे की काय असतो त्या अभिनेत्याची. किंवा एखादा अभंग टाकुया
किंवा आपण वारीला जात असल्याचा एखादा सेल्फी? डोक्यावर तुळस वगैरे?
पण मग
काही दिवसांपूर्वीच गोरेगाव येथील झाकण नसलेल्या उघड़या गटारीत पडलेल्या आणि अजूनही न सापडलेल्या दिव्यांश सिंग या चिमुकल्या बाळाची आठवण झाली. त्या बाळाची आई /बाप यांनी आषाढी किंवा इतर कुठले तरी उपवास केलेच असतील न! अहो सिंग म्हणजे हिन्दूच बहुतेक आणि हिन्दू धर्मात उपवासाला प्रचंड महत्व. बरं मुस्लमानसुद्धा रोजा (उपवास) ठेवतात.
इथे धर्माचा उल्लेख या साठी केला कारण गटारात कुठल्याही धर्माचं लेकरू पडू शकतं आणि शिवाय आपल्याला आवडतं धर्म- जात वगैरे कुठली ते पाहायला/ शोधायला. मागच्या वर्षी पावसात असाच कुणीतरी डॉक्टर बुड़ाला म्हणतात. आताशा नावसुद्धा आठवत नाही त्यांचं आणि पुढल्या वर्षी या दिव्यांश चं नाही आठवणार असो तर मुद्दा असा की मला वाटू लागली प्रचंड लाज आणि घृणा या सगळ्या गोष्टी बाबत.
मला वारंवार होणारा हा त्रास माझ्या आयुष्यातील आणि करियरमधील महत्वाचे क्षण काढून घेतोय आणि लक्ष विचलित करतोय. मला तर माझ्या घराचे हफ्ते भरायचे आहेत, मुंबईत पॉश जगायला पैसे कमवायचे आहेत भरपूर हा सद्विचार आला आणि इटक्यात नवीन सिनेमासाठी फोन आला व मी सर्व काही विसरून त्या कथेत गुंतत गेलो आणि आनंदी झालो.
पुढच्या वर्षीच्या सर्व पुरस्कार सोहळ्यात निदान नामांकन तरी नक्की मिळेल याची खात्री वाटली आणि पुरस्कार मिळालाच तर क़ाय मनोगत व्यक्त करावं याचा विचार कर लागलो आणि मला मी स्वतः एक माकड आहे असं वाटू लागलं आणि क्षणार्धात मी बेशरम झालो. आता आता लक्षात येतंय की धरण फुटू दे, माणसं बुडू दे, बलात्कार होऊ दे, इमारती /भिंती कोसळू दे, संपूर्ण मानवजात झाड़ाडोंगरांसकट नष्ट होऊ दे मी आणि माझं कुटुंब सुखरूप असेस्तोवर मला काही ही ही फरक पडत नाही..
-जितेंद्र जोशी
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.