आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरतो. लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीची पायी वारी करतात. शासनाच्या वतीनेही या दिवशी श्रीविठ्ठलाची शासकीय महापूजा केली जाते. आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री तर कार्तिकी एकादशीला राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा इतर प्रमुख मंत्र्याच्या हस्ते श्रीविठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा आपल्याकडे रिवाज आहे. श्रीविठ्ठलाच्या महापूजेची ही परंपरा फार जुनी आहे. या महापुजेशी संबंधित काही अपरिचित आणि ऐतिहासिक किस्से आपण पाहणार आहोत.
कधीपासून सुरु झाली श्रीविठ्ठलाची महापुजा ?
पंढरपूरच्या वारीची परंपरा तशी जुनीच आहे, पण आपल्याकडे सर्वसाधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासुन श्रीविठ्ठलाची महापुजा सुरु झाल्याचे मानले जाते. त्याकाळी पंढरपुरचे मंदिर आदिलशाही मुलुखात होते. नंतर थोरल्या शाहू छत्रपतींच्या काळात ते मंदिर मराठेशाहीत आले. पेशवाई काळात नेमण्यात आलेल्या देवस्थान समितीच्या सदस्यांनी आषाढी एकादशीला श्रीविठ्ठलाची महापूजा करण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. १८३९ मध्ये श्रीविठ्ठलाच्या महापूजेचा मान साताऱ्याच्या छत्रपती गादीकडे आला होता.
इंग्रजांच्या काळातील श्रीविठ्ठलाची महापूजा
इंग्रजांच्या काळातही श्रीविठ्ठलाची महापुजा सुरळीतपणे सुरु होती. इंग्रज लोक हिंदू नसल्याने त्यांनी कधी पूजा केली नाही, मात्र त्यांनी महापुजा करण्यासाठी हिंदू धर्मातील कलेक्टर. प्रांताधिकारी, मामलेदार नेमले होते. इंग्रजांनी श्रीविठ्ठल महापुजेला कधीही आडकाठी घातली नाही. उलट पूजाअर्चेच्या कामासाठी इंग्रज सरकारच मंदिर देवस्थान समितीला वार्षिक २००० रुपयांची देणगी देत असायचे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काही काळापर्यंत हीच पद्धत सुरु होती. संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाल्यानंतर तत्कालीन महसूलमंत्री राजारामबापु पाटील पूजेला आले आणि त्यांनी देवस्थानाला मिळणारे वर्षाचे अनूदान २००००रुपयांपर्यंत वाढवले. तेव्हापासून महाराष्ट्रातल्या मंत्र्याच्या हस्ते शासकीय महापूजेची प्रथा पडली.
१९७१ मध्ये शासकीय महापुजा बंद, १९७३ मध्ये पुन्हा सुरु
१९७० मध्ये समाजवादी विचारांच्या लोकांकडून “निधर्मी राज्यात सरकारने पूजाअर्चा नाही” यावर आंदोलन झाले. परिणामी १९७१ च्या आषाढी एकादशीपासून शासकीय महापुजा बंद झाली. त्यांनतर १९७२ मध्ये राज्यात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. वारकऱ्यांनी सरकारने पुजा बंद केल्याचा हा परिणाम आहे असे अआरोप केले. श्रीविठ्ठल महाराष्ट्रावर कोपला अशी सर्वांची भावना झाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी १९७३ पासून ही बंद केलेली महापुजा परत सुरु केली.
इंदिरा गांधी पंढरपुरात
आणीबाणीनंतर सत्तेतुन पायउतार झालेल्या इंदिरा गांधी १९७९-८० दरम्यानच्या काळात एके दिवशी पहाटे ४ वाजता पंढरपूरला आल्या होत्या. त्यांनी तिथली आपली सभा उरकून विठ्ठल मंदिरात येऊन पूजा केली. तिथून त्या डाक बंगल्यावर गेल्या. तिथे त्यांच्या नाश्त्यासाठी इतर पदार्थांसोबतच अंडीही होती. तेव्हा तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदिराजींना आज एकादशीच्या दिवशी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मांसाहारी अन्न खाऊ नये अशी विनंती केली. इंदिराजींनीही लगेच त्यांचे म्हणणे ऐकले आणि फक्त दुध घेऊन त्या पुढच्या दौऱ्यावर निघून गेल्या.
श्रीविठ्ठलाच्या महापुजेशी संबंधित काही ऐतिहासिक किस्से
१) १९५३ साली प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू पंढरपुरला दर्शनाला आले असताना श्रीविठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या दगडी उंबरठ्याला ते जोराने ठेचकाळले . ही एक अशुभ घटना म्हणून नंतर तो दगडी उंबरठा तिथून काढूनरखुमाई मातेच्या मंदिरात लावण्यात आला. २) एकदा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना महापूजेला आले असताना त्यांना यात्रेकरुंना भरावा लागणारा यात्राकर रद्द करण्याची दक्षिणा मागण्यात आली. आणि वसंतदादांनीही केवळ पंढरपुर नाही तर देहु आणि आळंदी येथीलही कर माफ केला.
३) एक माजी गृहमंत्री विठ्ठलाच्या महापूजेला आले असताना त्यांच्याकडे पैसेच कलेक्टरला दम देऊन दक्षिणा द्यायला लावली. हाच प्रकार रखुमाई मातेच्या पूजेच्या वेळी झाला. तेव्हा कलेक्टरकडचेही पैसे संपले होते. अशावेळी मंत्र्यांनी उत्पातांच्या कात्यालयातून पैसे मागवून दक्षिणा म्हणून रखुमाईच्या पुजारी असणाऱ्या उत्पातांच्या हातात दिले. ४) एकदा कर्मठ म्हणून ओळखले जाणारे ब्राम्हण मंत्रीमहोदय पूजेला आले. त्यांनी घाईत पूजा उरकली. पण त्यादिवशी पंढरीनगरीत मांसाहार मिळत नसल्याचे पाहून सोलापूर गाठून दुपारचे मांसाहारी भोजन तिथे केले.
५) शालिनीताई पाटील एकदा पूजेला आल्या असताना त्यांनी रखुमाई मातेला नवस केला. “वसंतदादा पाटलांना परत मुख्यमंत्री कर, मी तुला पाच टोळ्यांचे मंगळसूत्र वाहीन” आणि आश्चर्य बघा दादा मुख्यमंत्री झाले आणि शालिनीताई पाटलांनी आपला नवस फेडला. मात्र त्यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी नवस करूनही काही उपयोह झाला नाही.
६) पंडित लालबहादूर शास्त्री रेल्वेमंत्री असताना रेल्वेने पंढरपूरला आले होते. तेव्हा रेल्वे स्टेशनवर कॉलराची लस टोचूनच पुढे सोडले जात होते. मात्र आपल्या आयुष्यात आपण कोणतीही लस टोचली नसल्याचे सांगत शास्त्रींनीं नकार दिला. त्यासोबतच आपण मंत्री असलो म्हणून इथला नियमही मोडणार नाही असे सांगत त्यांनी रेल्वेस्टेशन वरूनच श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन ते तिथूनच परत गेले.
७) १९५५ च्या काळात राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद पंढरपूरला आले. ते थेट चंद्रभागेत स्नानासाठी गेले. सुरक्षारक्षकांनी धावपळ करून चादरी धोतरांनी त्यांना आडोसा केला. ते तसेच अनवाणी चालत मंदिरत आले. स्वतःच मंत्र म्हणत त्यांनी पूजा केली. ८) राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह पंढरपूरला आले असताना नामदेव मंदिरात गेले. शीख धर्मात संत नामदेवांना प्रचंड आदराचे स्थान आहे. त्यांनी नामदेव महाराजांच्या वंशजांच्या पाया पडून नंतर श्रीविठ्ठलाची महापूजा केली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.