पाच आठवड्यांच्या रोमांचक थरारानंतर विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड संघां दरम्यान पहिली उपांत्य लढत आज मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे. सामन्याच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला असून, हवमानही ढगाळ राहणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज फलंदाजांच्या कौशल्याची कसोटी बघतील.
विश्वकरंडक स्पर्धेत या दोन्ही संघांमध्ये यापूर्वी सामना झाला असला, तरी उपांत्य फेरीत ते प्रथमच समोरासमोर येणार असल्यामुळे चुरस वेगळीच असेल. या विश्वचषकातील दोन्ही संघादरम्यानचा लीग स्टेजचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांना भिडणार आहेत.
भारतासमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान असणार आहे. न्यूझीलंड संघात मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर आणि केन विलियम्सन सारख्या स्फोटक आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. या तिघांना लवकर रोखण्याचे आव्हान भारताच्या गोलंदाजांवर असणार आहे. या तिघांपैकी एकाचा जरी जम मैदानात बसला तर भारताला मोठे आव्हान मिळू शकते.
गोलंदाजी ही भारतीय संघाची सध्या ताकद बनली आहे. बुमरा, शमी हे भेदक गोलंदाजी करत आहेत. भारताने सतत टीममध्ये बदल केले आहेत. आज सेमीफायनलसाठी कोण अंतिम शिलेदार असतील हे बघण्यासारखे असेल. पाचवा गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्याने चांगली कामगिरी केली आहे. या तिघांच्या बरोबरीने युजवेंद्र आणि कुलदीप ही फिरकी जोडी आहेच.
मागील सामन्यात कुलदीप यादवला आणि रवींद्र जडेजाला संधी मिळाली होती. आज चहलला संधी मिळू शकते तर शमी सुद्धा टीममध्ये परतेल. दिनेश कार्तिकही खेळणार की नाही हे निश्चित नाही. त्यामुळे भारताच्या अंतिम अकरा नावांसाठी वाट बघावी लागणारं आहे.
यापूर्वी कोहली आणि विलियम्सन यांच्यादरम्यान झाली होती सेमीफायनलची मॅच-
११ वर्षांपूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान U-19 वर्ल्डकपच्या सेमीफायनलची मॅच झाली होती. त्यावेळी देखील टीम इंडियाचा कर्णधार हा विराट कोहली होता तर न्यूझीलंडचा कर्णधार हा केन विलियम्सन होता. ११ वर्षांच्या कालावधीत दोघांनीही क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख बनवली आहे.
त्यावेळी झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडचा ३ विकेटनी पराभव केला होता. आणि भारतासाठी आनंदाची बाब म्हणजे त्यानंतर भारताने फायनल जिंकत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
आज होणाऱ्या सामन्यात देखील भारत अशीच कामगिरी करेल अशी आशा भारतीयांना आहे. आज न्यूझीलंडचा पराभव करून इतिहासाची पुनरावृत्ती भारत करेल यासाठी टीम इंडियाला शुभेच्छा.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.