जयपूरमध्ये इन्कम टॅक्स विभागाला १०० कोटींच्या संपत्तीची अशी एक मालकीण मिळाली आहे जी परिवार चालवण्यासाठी पै-पै साठी महाग आहे. इन्कम टॅक्स विभागाने जयपूर दिल्ली हायवे मार्गावर १०० कोटींहून अधिक किमतीची ६४ बिघे जमीन शोधून काढली आहे, ज्याची मालकीण एक आदिवासी महिला आहे. आश्चर्याची बाब अशी की त्या महिलेला स्वतःलाही माहीत नाही की तिने जमीन कधी आणि कुठे विकत घेतली आहे !
कोण आहे १०० कोटींच्या जमिनीची मालकीण ?
१०० कोटींच्या या जमिनीच्या मालकिणीचे नाव संजू देवी मीणा आहे. तिचे पती आणि सासरे मुंबईमध्ये काम करायचे. २००६ मध्ये तिला जयपूरच्या आमेरमध्ये नेऊन कागदपत्रांवर तिचा अंगठा घेण्यात आला होता. तिच्या पतीचे निधन होऊन १२ वर्ष झाली तरी तिला माहित नाही तिच्याजवळ कोणती संपत्ती आहे आणि ती कुठे आहे ?
पतीच्या निधनानंतर काही काळ तिच्या घरी कुणीतरी ५००० रुपये देऊन जायचे, मात्र नंतर ते ही बंद केले. पतीच्या निधनानंतर कमाईचा मार्ग नसल्याने आणि दोन मुलांचा सांभाळ करायचा असल्याने तिने रोजंदारीवर काम केले. जनावरे पाळली.
इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने घेतला ताबा
इन्कम टॅक्स विभागाने ती जमीन आता आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यांनी तिथे बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर लिहले आहे की, “बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यानुसार या जमिनीला बेनामी घोषित करण्यात येत असून आयकर विभाग आपल्या ताब्यात घेत आहे. या जमिनीची मालकीण संजू देवी मीणा आहेत. त्या या जमिनीच्या मालकीण होऊ शकत नाहीत, त्यामुळे इन्कम टॅक्स विभाग त्वरित ही जमीन आपल्या ताब्यात घेत आहे.”
वास्तविक पाहता आयकर विभागाकडे तक्रार आली होती की, दिल्ली हायवेवर मोठ्या संख्येने दिल्ली आणि मुंबईच्या उद्योगपतींनी आदिवासींच्या बनावट नावे जमिनी विकत घेत आहेत. केवळ कागदपत्रांमध्ये याचे व्यवहार होत आहेत. कायद्यानुसार आदिवासींची जमीन आदिवासी लोकच खरेदी करू शकतो.
कागदपत्रे झाल्यानंतर हे लोक आपल्या लोकांच्या नावे पॉवर ऑफ ऍटर्नीच्या सह्या करून ठेवतात. आयकर विभागाने खऱ्या मालकाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर समजले की, जमिनीची मालकीण राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील निम का थाना तालुक्यातील दिपावास गावात राहते. डोंगरामध्ये वसलेल्या या गावात पोहोचणे सोपे नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.