स्त्री-पुरुष समानतेचा हा काळ आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आहे. महिला वाहने चालवतात, नोकरी करतात आणि पंक्चरही काढतात. हो ! आपल्या महाराष्ट्रात पंक्चर काढणाऱ्या महिलाही आहेत.
ट्रकच्या मोठ्या चाकातून ट्युब काढुन त्याची पंक्चर शोधुन त्याला पॅच लावुन परत चाक ट्रकला जोडण्याचे काम किती जिकिरीचे असते ते एखाद्या पंक्चरवाल्याला विचारा. हे काम करण्यातसुद्धा महिला मागे नाहीत. पत्रकार प्रवीण मनोहर यांनी महाराष्ट्रातील अशाच दोन महिलांची केलेली स्टोरी आम्ही आपल्यासाठी इथे देत आहे.
चोहट्टा बाजारातील सरिताताई
गावामध्ये आपल्या हातांना काम नाही म्हणुन सरिताताईंचे पती राजाराम आपले दुधगाव सोडुन कुटुंबासहित अकोला-अकोट रस्त्यावर असणाऱ्या चोहट्टा बाजार इथे रहायला आले. तिथे त्यांनी आपल्या मोठ्या भावाच्या पंक्चरच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. नंतर मोठ्या भावाने दुसरीकडे दुकान सुरु केल्यानंतर हे दुकान राजारामांच्या हवाली केले. आपल्या पतीला मदत म्हणून सरिताताईंनी पंक्चरच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या सायकल, मोटारसायकलच्या पंक्चर काढायला लागल्या.
आज त्या ट्रॅक्टरपासून ट्रकची चाकं उचलून त्यांच्या पंक्चर काढतात. वाहनांची दुरुस्ती हे तसं पुरुषी काम झालं, पण सरिताताईंनी त्यातही जम बसवला. रोडलाईनमध्ये दुकानावर येणारे लोक कसे असतील ते सांगू शकत नाही, पण सरिताताई आपले काम चोख करतात. त्यांच्या कामाबद्दल कुणालाही तक्रार नसते. कधीकधी अर्ध्या रात्री कुणाच्या गाड्या पंक्चर झाल्या तर कसलाही कंटाळा न करता सरिताताई आपल्या पतीच्या मदतीला हजर असतात. राजाराम यांनाही आपल्या पत्नी कमाईत भर टाकत असल्याचे पाहून अभिमान वाटतो.
गोंदियाच्या भागरताताई
गोंदियामधील भागरताताई या सुद्धा आपल्या पतीच्या पंक्चरच्या दुकानात मदत करायच्या. मात्र २५ वर्षांच्या असताना त्यांच्या पतीला लकवा आला कालांतराने दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. पतीच्या पश्चात कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्यांनी आपल्या पतीचे पंक्चरचे दुकान सुरु केले. त्यातून मिळणाऱ्या कमाईतुन भागरताताईंनी आपले घर चालवले, मुलांचे शिक्षण पूर्ण केले, त्यांचे लग्नही लावून दिले.
मागच्या वर्षी पंक्चरचे दुकान बंद करून घरी जात असताना वाटेत त्यांचा अपघात झाला. ४ महिने खाटेवर झोपून काढले आणि नंतर पुन्हा आपल्या कामाला परत सुरुवात केली. आज त्यांचे वय ६५ आहे तरीही त्या पंक्चरचे दुकान चालवत आहेत. खरोखर महिलाही पुरुषांना कमी नाहीत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.