जसप्रीत बुमराह, भारतीय क्रिकेटमधला यॉर्कर किंग ! २०१९ च्या विश्वचषकात खेळणारा तो जगातील सर्वोत्कृष्ट बॉलर आहे. जसप्रितचा जन्म ६ डिसेंबर १९९३ या दिवशी अहमदाबादमधील एका शीख फॅमिलीत झाला. तो ७ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्याच्या आईने त्याला वाढवले. त्याची आई दलजित या शाळेत प्रिन्सिपल आहेत.
बुमराह यॉर्कर टाकायला कसा शिकला ?
आपण मोठे झाल्यावर क्रिकेटर म्हणून करिअर करू असं जसप्रितला कधी वाटले नव्हते. लहानपणापासूनच जसप्रीत टेनिस बॉलवर क्रिकेट खेळायचा. त्या काळापासूनच त्याला बॉलिंग करायला आवडते. पाकिस्तानच्या वसीम अक्रम, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनसारख्या इंटरनॅशनल विकेट टेकर बॉलर्सचा त्याने अभ्यास केला. उन्हाळ्याच्या कडक दिवसात त्याने घराच्या आतमध्ये सराव केला.
आपल्या आईच्या दुपारच्या झोपेत अडथळा येऊ नये म्हणून जसप्रीत आपल्या जवळचा टेनिस बॉल घराची भिंत आणि छत जिथे जोडले जातात त्या कोपऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करायचा. बॉलचा कमीत कमी आवाज येण्याचा हाच मार्ग होता. परंतु क्रिकेटमधील सर्वात अवघड कला असणाऱ्या यॉर्कर मध्ये परीपूर्णता आणण्यासाठी यामुळे चांगला सराव झाला.
असा झाला जसप्रितचा प्रवास
जसप्रितच्या आईला क्रिकेटमध्ये खात्रीने यश मिळेल याविषयी आशा वाटत नव्हती. त्यांची इच्छा होती की, जसप्रितने उच्चशिक्षण घेण्यासाठी त्याच्या चुलतभावासोबत कॅनडाला जावे. परंतु वयाच्या १४ व्या वर्षी जसप्रितने क्रिकेट खेळात करिअर करण्यासाठी आपल्या आईला तयार केले. वयाच्या १९ व्या वर्षी त्याने १९ वर्षांखालील गुजरातच्या संघात प्रवेश मिळवून क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या वेगळ्या स्टाईल आणि अचूक माऱ्याने लोकांना आकर्षित केले.
तो २० वर्षांचा असताना मुंबई इंडियन्सचे कोच जॉन राईट यांनी एका देशांतर्गत टी-२० सामन्यात त्याला हेरले. त्यांनतर लवकरच आयपीएलच्या संघाने त्याला उचलले. रॉयल चॅलेंजर बंगलोर विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ विकेट घेतल्या. सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माला त्याने प्रभावित केले. शेवटी त्याच्या आईला आपल्या मुलाच्या करिअरची निवड पटली.
…आणि भारतीय संघात मिळाले स्थान
२०१३-१४ च्या रणजी करंडकात वयाच्या २० व्या वर्षी तो गुजरातचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर बनला. वयाच्या २२ व्या वर्षी विजय हजारे करंडकात ९ सामन्यात २१ विकेट घेऊन तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या तालिकेत वरच्या स्थानी राहिला. वयाच्या २३ व्या वर्षी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद शमी जखमी झाल्याने त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून जसप्रितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या दौऱ्यात त्याने भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा बॉलर म्हणून मान मिळवला.
महेंद्रसिंग धोनीने “दौऱ्यातील सर्वोत्तम शोध” म्हणून त्याच्याबद्दल उद्गार काढले.
वयाच्या २४ व्या वर्षी त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत ५ च्या इकॉनॉमी रेटने ५ सामन्यात ४ विकेट घेतल्या. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला दक्षिण आफ्रिकेत प्रतिष्ठेची कसोटी टोपी देण्यात आली. आपल्या Skiddy Nippers आणि Scrambled Seamers मध्ये तो फार पटाईत आहे. त्याच्या बॉलिंग अंदाज सहजासहजी बॅट्समनच्या लक्षात येत नाही. २०१८ मध्ये ९ कसोटी सामन्यात त्याने ४८ विकेट घेतल्या. म्हणूनच जसप्रीत हा भारताचा सर्वात भेदक गोलंदाज म्हणून आज ओळखला जातो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.