शहरात गाड्यांच्या ड्रायव्हिंग सीट वरती महिला सर्रासपणे आढळून येतात. आपल्यासाठी आता ती सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. पण हीच संख्या हायवे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांवर आपोआप कमी होत जाते. कारण शहरांच्या बाहेर गाड्यांची स्टियरिंग पुरुषांच्या हातात असते.
पण अशी एक महिला आहे जिने गेल्या पंधरा वर्षांपासून शहर असो, गाव असो किंवा लांब-लांबपर्यंतचे हायवे असोत, सगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर १० चाकी ट्रक चालवून हा समज खोडून काढला आहे. अशा पद्धतीने ती महिला भारतातील पहिली महिला ट्रक ड्रायव्हर बनली आहे. पाहूया या महिलेविषयी…
कोण आहे भारतातील पहिली महिला ट्रक ड्रायव्हर ?
मध्यप्रदेशाच्या भोपाळमध्ये राहणारी योगिता सूर्यवंशी ही भारतातील पहिली महिला ट्रक ड्रायव्हर आहे. योगिता दोन मुलांची आई असून ती मागच्या १५ वर्षांपासून ट्रक चालवून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहे. २००३ मध्ये योगिताचे पती राजबहादूर रघुवंशी यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. पतीच्या अंत्यसंस्काराला येत असणाऱ्या योगिताच्या भावाचाही रस्ते अपघातातच मृत्यू झाला.
मध्यप्रदेश पासून आंध्रप्रदेश पर्यंत चालवते १० चाकी ट्रक
एक महिला जिला साधी ड्राइव्हिंग सुद्धा येत नव्हती त्या योगिताने आपल्या ट्रकसोबत भारताच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला आहे. ट्रक चालवत असताना योगिताला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून नेहमी सावधपणे ट्रक चालवावा लागतो. आपल्या प्रवासादरम्यान ती कधी ढाब्यावर जेवते तर कधी रस्त्याच्या कडेला ट्रक थांबवून स्वतः जेवण बनवून खाते.
वेळप्रसंगी ती ट्रक मध्येही झोपते. ही सगळी कामे ती एकटीच करते. योगिताचे म्हणणे आहे की, लांबच्या प्रवासात ट्रक चालवताना तिला कशाची भीती किंवा धोका वाटत नाही. इतर ड्रॉयव्हरही तिला प्रोत्साहन देतात. ढाब्यांवर तिचे खूप चांगले स्वागत केले जाते.
वकील, ब्युटिशिअन ते ट्रक चालक
ट्रक चालवण्यापूर्वी योगिताने कॉमर्स डिग्री घेतली होती. तिने वकीलीचेही शिक्षण पूर्ण केले आहे. सोबतच योगिताकडे ब्युटिशियनचे प्रमाणपत्र देखील आहे. परंतु आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी या गोष्टी पुरेशा नाहीत याची जाणीव झाल्यानंतर योगिताने ट्रक चालवण्याचा निर्णय घेतला. प्रवासाच्या निमित्ताने योगिता हिंदी सोबतच इंग्रजी, गुजराती, मराठी, तेलगू अशा भाषाही शिकली आहे. योगिताची मुलगी आज इंजिनिअर आहे तर मुलगा कॉलेजात शिकत आहे.
योगिताच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम ! माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.