गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून जवानांना टार्गेट केलं जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २४ तासांत भारतीय जवानांवर चार दहशतवादी हल्ले झाले. यानंतर भारतीय लष्कराकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यांत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. मात्र, या भ्याड हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत असताना एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. तसंच एका अधिकाऱ्यासह १८ जवान आणि दोन स्थानिक देखील जखमी झाले आहेत.
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग चकमकीत शहीद झालेले मेजर केतन शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबीयांना व्हॉट्सअॅपवर फोटोसह एक मेसेज पाठवला होता. त्यांनी पाठवलेला मेसेज शेवटचा ठरला. त्यांनी फोटो शेअर करताना लिहिलं होतं की, कदाचित हा माझा शेवटचा फोटो असेल. चकमकीआधी सोमवारी सकाळी सात वाजता त्यांनी हा मेसेज आणि फोटो आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवला होता. हा फोटो शेअर केल्याच्या काही तासातच अनंतनागमधील चकमकीत केतन शर्मा शहीद झाल्याचं वृत्त आलं.
पत्नीच्या मेसेजला रिप्लाय नाही
मेजर केतन शर्मा यांचे चुलत बंधू अनिल शर्मा म्हणाले की, “जेव्हा त्यांनी व्हॉट्सअॅप मेसेज केला होता, तेव्हा त्यांच्या पत्नीने रिप्लाय केला होता. पण आम्हाला आशा होती की ते सुरक्षित परत येतील. मात्र बराच वेळ त्यांचा रिप्लाय आला नाही. त्यांची पत्नी इरा मुलीसह माहेरी असताना, केतन शर्मा जखमी झाल्याची माहिती मिळाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास सैन्याचे अधिकारी घरी आले आणि केतन शर्मा शहीद झाल्याचं त्यांनी सांगितलं.”
डोक्यात गोळी लागून केतन शर्मा शहीद
अनंतनाग परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. सोमवारी (१७ जून) पहाटे अचबालच्या बदौरा गावात भारतीय सैन्याची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी १९ राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असलेले केतन शर्मा शहीद झाले.
मेजर केतन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली झाडा-झुडपात लपलेल्या अतिरेक्यांचा शोध सुरु होता. त्याचवेळी अतिरेक्यांनी गोळीबार केला. ही गोळी केतन शर्मा यांच्या डोक्यात लागली आणि ते शहीद झाले. तर अन्य अधिकारी आणि दोन जवान जखमी झालेत. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यातही जवानांना यश आलं.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
शहीद झालेले केतन शर्मा हे मूळचे मेरठचे आहेत. ३२ वर्षीय मेजर केतन शर्मा यांच्या कुटुंबात पत्नी इरा मंदर शर्मा, चार वर्षांची मुलगी कायरा, आई-वडील आणि एक धाकटी बहिण आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शहीद मेजर केतन शर्मा यांना खासरेकडून भावपूर्ण श्रध्दांजली.