महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठल्याही खेड्यात, वाड्यावस्त्यांवर गेलात तर तुम्हाला “शिवाजी” नाव असणारा एकतरी व्यक्ती सापडेल. मग तो व्यक्ती कुठल्याही जातीधर्माचा असो. हे प्रेम आहे लोकांचं शिवाजी या नावावर ! “शिवाजी” नावावर आजपर्यंत कित्येक संस्था निघाल्या. संघटना निघाल्या. राजकीय पक्ष निघाले. सभागृहे निघाली. चौक निघाले, रस्ते निघाले, नागरी वस्त्या निघाल्या. दुकाने निघाली. उद्योग व्यवसाय निघाले. इत्यादि इत्यादि ! ही यादी न संपणारी आहे.
“शिवाजी” या नावाच्या माध्यमातून महाराजांशी जोडलं जाण्यात लोकांना अभिमान वाटतो. आता यात अजून एक भर पडली आहे. किल्ले रायगडवर आढळणाऱ्या एका वनस्पतीला शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. पाहूया त्याबद्दल…
कोणती आहे ती वनस्पती ?
केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये असणाऱ्या किल्ल्यांवर आढळणारी आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असणारी फ्रेरिया इंडिका असे नाव असणारी ती वनस्पती आहे. स्थानिक भागातील लोक तिला “शिंदळ माकुडी” नावाने ओळखतात. पुणे जिल्ह्याचे नैसर्गिक मानचिन्ह प्रतीक असणारे फुल म्हणून या वनस्पतीला ओळख प्राप्त आहे. ही वनस्पती अतिशय दुर्मिळ असून अतिसंकटग्रस्त म्हणून घोषीत करण्यात आली आहे.
कसा लागला या वनस्पतीचा शोध ?
फ्रेरिया इंडिका वनस्पतीचा शोध सर्वप्रथम शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरीवर लागला. डॅल्झेल नावाच्या वनस्पती शास्त्रज्ञाने तिचा शोध लावला. सह्याद्री पर्वतातील जुन्नर, शिवनेरी, पुरंदर, वज्रगड, मुळशी, रंधा फॉल, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, शिवथरघळ, अंजनेरी भागातील तीव्र उत्तरांच्या डोंगरकड्यांवर ही वनस्पती आढळून येते.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मिळाले नवीन नाव
फ्रेरिया इंडिका या वनस्पतीला येणाऱ्या फुलांचा रंग भगवा-लालसर असतो. त्यांचा आकार सुदर्शन चक्राप्रमाणे असतो. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी आहे आणि या वनस्पतीचा शोधही शिवनेरीवरच लागला. तसेच या वनस्पतीचा प्रादेशिक आढळही सह्याद्री पर्वतरांगांतील गडकिल्ल्यांवरच आहे. त्यामुळे या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे अशी पर्यावरणप्रेमी, शिवप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांची इच्छा होती. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या वनस्पतीचे नामकरण “शिवसुमन” असे करण्यात आले आहे. तसेच किल्ले रायगडावर शिवसुमनाच्या ५० रोपांचे वृक्षारोपणही करण्यात आले आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.