मागच्या रविवारी देशाची राजधानी दिल्ली येथे झालेल्या गॅंगवॉरच्या घटनांमुळे संपूर्ण शहर थरथरून थरथरून उठले होते. द्वारका मोड रेल्वे स्टेशनच्या जवळ दोन गुंडांनी भररस्त्यात पांढऱ्या रंगाची कार थांबवून तिच्यावर सपासप गोळ्या घातल्या होत्या. त्या गोळीबारामध्ये मनजीत महाल गँगचा राईट हँड प्रवीण गेहलोत ठार झाला होता. दिल्लीच्या द्वारका मोड सारख्या गर्दीच्या भागात या गॅंगवॉरचे भयानक चित्र पाहून तिथले लोक अजून भीतीखाली वावरत आहेत.
गोळ्यांचा आवाज ऐकून पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना भयंकर दृश्य पहायला मिळाले. ते दृश्य पाहून कॉन्स्टेबल नरेश कुमार यांनी एकट्याने मोर्चा सांभाळला. नरेश कुमारांनी मेट्रोच्या पिलरमागे दडून गुंडांवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातल्या एका गोळीने गँगस्टर विकास दलाल याचा अचूक वेध घेत त्याला यमसदनी पाठवले.
या धाडसामुळे ५६ वर्षांचे कॉन्स्टेबल नरेश कुमार रातोरात स्टार बनले. नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल दिल्ली पोलिसांनी त्यांना “आऊट ऑफ टर्न प्रमोशन” देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहेत कॉन्स्टेबल नरेश कुमार ?
वर्तमानात दिल्ली पोलिसांच्या PCR सेवेत कार्यरत असणारे नरेश कुमार सन १९९१ मध्ये दिल्ली पोलीस दलात रुजू झाले होते. त्यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक पोलीस दलातच कार्यरत आहेत. नरेश कुमारांच्या मुलानेही नुकतेच कॉन्स्टेबल म्हणून दिल्ली पोलीस दल जॉईन केले आहे.
असा केला एन्काउंटर
आपल्या कामगिरीबद्दल नरेश कुमार सांगतात की, “मी यापूर्वीही अनेकदा धोकादायक ठिकाणी छापे टाकले आहेत, पण ही घटना सगळ्यांपेक्षा वेगळी होती. यादरम्यान मी एकट्यानेच मोर्चा सांभाळला होता. पोलिसांना सूचना देण्यासाठी माझ्याकडे बॅकअप नव्हता. वेळ कमी असल्याने मी केवळ ५ मिनिटात ३ गोळ्या चालवून गँगस्टर विकास दलालला ठार केले.
जेव्हा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता त्यावेळेस रीलोडींग करताना माझी बंदूक खाली पडली होती. एकवेळ वाटले गुंडांची गोळी कधीही माझा वेध घेईल, पण माझं नशीब चांगलं होतं. मी त्वरित बंदूक उचलून पुन्हा रीलोड करून गुंडांसोबत लढत राहिलो.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.