बाळाची वाट पाहणा-या मातेला आणि इतर नातेवाइकांना एक चिंता सतावत असते, नॉर्मल की सीझर? प्रसूती नॉर्मल व्हावी असा घरातील जुन्या जाणत्यांचा आग्रह, तर तब्येतीबद्दल रिस्क नको म्हणून सीझरही चालेल, असे म्हणण्याकडेही आजकालच्या अनेक जोडप्यांचा कल. प्रसूतीविषयीच्या लोकांच्या मनात काही समज- गैरसमज आहेत. त्याविषयी आढावा घेऊया.
सिझेरियन शस्त्रक्रिया म्हणजे नेमके काय?
नैसर्गिक प्रसूती जेव्हा अशक्य असते किंवा तशी झाली तर मातेला किंवा बाळाला शारीरिक इजा होण्याचा धोका असतो, अशा वेळी भूल दिल्यानंतर किंवा कमरेखालचा भाग बधिर करून ओटीपोटावर बहुतेक वेळा आडवा छेद दिला जातो. त्यानंतर आतील सर्व आवरणे कापून गर्भाशयाच्या खालच्या भागावर आडवा छेद दिला जातो व बाळ बाहेर काढले जाते. वार व नाळ पूर्णपणे बाहेर काढल्यानंतर गर्भाशय व पोट पूर्ववत शिवले जाते.
सीझर प्रसुती (ऑपरेशन) कधी करतात?
अ) आधी ठरवून
गर्भारपणात मातेचे काही आजार असतील किंवा नऊ महिन्यांच्या शेवटी बाळाची ठरावीक स्थिती असेल तर आधी ठरवून ही शस्त्रक्रिया करावी लागते. यामुळे नैसर्गिक प्रसूतीमध्ये मातेला व बाळाला होणारा संभाव्य धोका टाळता येतो. प्रसूतीच्या संभाव्य तारखेच्या एक-दोन आठवडे आधी ही शस्त्रक्रिया ठरवली जाते. शस्त्रक्रियेपूर्वी बाळाची वाढ पूर्ण झालेली आहे व लागणारी सर्व सामग्री उपलब्ध आहे ही खात्री केली जाते.
पुढील काही प्रसंगांत अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करणे अत्यावश्यक ठरते.
१) वार गर्भाशयाच्या खालच्या भागात असेल. २) माकडहाडामधील पोकळीपेक्षा बाळाचे डोके मोठे असेल. ३)बाळ आडवे असेल. ४)पहिल्या प्रसूतीच्या वेळचे बाळ पायाळू असेल.
५) मातेचे काही आजार-उदा. गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर, ओटीपोटात मोठी गाठ, पोलिओसारखा रोग, गरोदरपणात रक्तदाब खूपच जास्त असणे व त्यामुळे आकडी येणे, मातेला हृदयाचे विविध रोग इ., ६)मातेचे वय खूप जास्त असेल. ७)पूर्वी दोन वेळा सिझेरियनची शस्त्रक्रिया झालेली असेल.
बाळाच्या व मातेच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आधीपासूनच असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अचानक उद्भवणा-या समस्या टाळता येतात.
ब) आयत्या वेळी केलेली शस्त्रक्रिया
बाळाचे डोके ठरावीक वेगाने खाली सरकले नाही किंवा गर्भाशयाचे तोंड उघडायला वेळ लागला इ. समस्या अचानक येऊ शकतात. अशा वेळी नैसर्गिक प्रसूतीचा प्रयत्न सोडून देऊन शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागतो. जर वेळीच हा निर्णय घेतला तर बाळाला होऊ शकणारा संभाव्य धोका टाळता येतो.
पुढील काही कारणांनी ही शस्त्रक्रिया आयत्या वेळी करावी लागते.
१)प्रसूतीची प्रक्रिया पुढे न सरकणे २)बाळाच्या हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा बाळाला गर्भाशयात त्रास होणे. अचानक शस्त्रक्रिया करण्याच्या केसेसमध्ये हे कारण सर्वाधिक आढळते.
३) योग्य पद्धतीने नैसर्गिक प्रसूती चालू असतानाही बाळाने पोटात शी केली किंवा बाळाच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले तर तातडीने ऑपरेशन करावे लागते. जर असा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला तर बाळाच्या आरोग्यास खूपच मोठा धोका होऊ शकतो.
– दिलीप नारायणराव डाळीमकर
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.