१८ मे २०१९ पासून स्टार प्रवाहवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा हि मालिका सुरु झाली आहे. हि मालिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. १८ मे २०१९ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला गेला.
मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा मालिकेतून घेतला जाणार आहे.
क्रांतिसूर्य तू – शिल्पकार तू भारताचा, बोधिसत्व मूकनायका…. भारताचा पाया माझा भीमराया… असे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांनी केले आहे.
या मालिकेत त्यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा चिमुरडा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या छोट्या कलाकाराचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. या बालकलाकाराचं नाव आहे अमृत गायकवाड. अमृत मूळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकण्याचा त्याला छंद आहे.
या मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरु होती, तेव्हा अमृतला त्याबद्दल समजलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं. अमृतचा उत्साह आणि हजरजबाबीपणामुळे छोट्या आंबेडकरांच्या रोलसाठी त्याची निवड झाली. सेटवर सर्वांचा लाडका असलेला अमृत दिग्दर्शक अजय मयेकरांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करतो.
मालिकेत अमृतच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंदासोबत त्याचं नातं अधिक घट्ट आहे. आनंदाशिवाय एक क्षणही तो राहत नाही. हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. या मालिकेचं शीर्षकगीतही अमृतच्या तोंडपाठ आहे. सेटवर सतत तो हे शीर्षकगीत गुणगुणत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनयाचं वेड असलेल्या अमृतला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे.
या मालिकेत अभिनेता सागर देशमुख हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत आहेत तर रमाबाई आंबेडकरांची व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.