सदया लग्नसराईचे दिवस चालु आहेत.लग्नपंगतीत जेवणाची नासाडी झालेली बऱ्याच वेळा आपणाला दिसून येते.जेंव्हा लग्नपंगतीत अश्याप्रकारे जेवण वाया जाते तेंव्हा मन फार दुःखी होते व मला लहानपणीचे घटना आठवते…..
आमच्या गावातील वाडीवरचा छोटा गण्या बुंदीसाठी रडत होता. गण्याची आई आमच्या शेतात मजुरीसाठी आली होती. शाळेला सुट्टी होती म्हणून गण्याला सुद्धा सोबत घेऊन आली होती.दुपारच्या जेवणासाठी मजूर लोक आंब्याच्या सावलीत बसले होते. गण्या त्याच्या आईला बुंदी मागत होता.
आदल्या दिवशी गावातील सावकाराच्या मुलीचे लग्न होते. लग्नात बुंदीची पंगत होती. लग्नात सर्व पाहुणेरावळे व गावातील लोकांच्या पंगती उठल्या तरी वाडीवर आवतन अजून आले नव्हते. सावकाराच्या मुलीच्या लग्नात बुंदीचे जेवण आहे म्हणून गण्या सकाळपासून खुश होता. संध्याकाळचे सात वाजले तर आवतन सांगणारा माणूस अजून आला नव्हता.गण्या आवतनाची वाट बघून तसाच झोपी गेला होता.गण्या झोपला तोवर माणूस जेवायला बोलवायला आला होता. सर्व पाहुणे व गावकऱ्यांचे जेवणं आटोपले होते. आता फक्त गावकुसाबाहेरच्या वाडीवरच्या गोरगरीब शेतमजूर लोकांची पंगत बाकी होती.
वाडीवरचे लोक आपआपल्या ताट वाट्या पेले घेऊन जेवायला आले होते.शेवटची पंगत बसली होती.पंगतीत वरण भात चपाती व वांग्याची भाजी ताटात वाढली व सर्वाना थोडी थोडी बुंदी दिली. सर्व लोकांचे जेवण झाले होते. सावकाराने या लोकांकडून वरण भात भाजीचे मोठे मोठे पातेले घासून साफ करून धुवून घेतले. पंगतीत जेवण वाढण्यासाठी लागणाऱ्या पातेले,बादली, टोपले हे सर्व धुवून घेतले.लग्न मंडपात उडून गेलेल्या पत्रावळ्या,सर्व कचरा झाडून साफसफाई करून घेतली.
घरी जाताना गण्याच्या आईने गण्यासाठी वाढणं मागितले,बुंदी मागितली. तिचा गण्या बुंदीच्या पंगतीच्या आवतनाची वाट बघून तसाच झोपी गेला होता. लग्न घरच्या लोकांनी बुंदी संपली असे सांगितल्याबरोबर गण्याची आई निराश झाली. बुंदीचे वाढणं मिळणार नाही असे गण्याच्या आईला अगोदर सांगितले असते तर गण्याच्या आईने स्वतःला मिळालेली मुठभर बुंदी गण्यासाठी बाजूला ठेवली असती.
या अगोदरचे पाहुणे व इतर गावकऱ्यांच्या पंगतीला पात्रावर उष्टी पडून बरीच बुंदी वाया गेली होती. गावातील लग्नकार्यात पाहुणेरावळे व गावकऱ्यांच्या पंगती उरकल्यानंतर गावकुसाबाहेरील वाडीवरच्या गोरगरीब शेतमजूर लोकांना आवतण पाठविण्याची गावात पद्धत होती. या लोकांना जेऊ घातल्यानंतर त्यांच्याकडून लग्नातील स्वयंपाकांचे भांडे घासून व मंडप सफसफाईचे काम करून घेण्यात येत असे.
गण्या बुंदीसाठी रडत होता. आंब्याच्या झाडाखाली दुसऱ्याबाजूला बसलेल्या माझ्या वडिलांनी ऐकले होते. तुला बुंदी देतो अशी समजूत काढत गण्याचे रडणे वडिलांनी कसेबसे थांबवले होते. पंधरा दिवसांनी माझ्या एकुलत्या एक बहिणीचे लग्न होते. वडिलांनी सर्व गावाला चुलबंद आमंत्रण दिले होते.लग्नात बुंदीचे जेवण होते. पाहुणे व सर्व गावाला बुंदी कमी पडून नये म्हणून बुंदी जास्त बनविली होती.
गावकुसाबाहेरील,
वाडीवरच्या लोकांना सकाळीच आवतण दिले होते. लग्नात वऱ्हाड खूप आले होते.सर्वांचे भरपेट बुंदीचे जेवणं झाले होते. बुंदी जास्त बनविल्यामुळे वाडीवरच्या लहानमोठया मंडळीना बुंदी पोटभर दिली होती.पंगत झाल्यानंतर वाडीवरच्या लोकांना डब्बेचे डब्बे बुंदीचे वाढणं त्यांच्या घरच्यासाठी दिले होते.
लग्नात जास्त खर्च केल्यामुळे जवळचे सर्व नातेवाईक माझ्या वडिलांना एवढा खर्च का केला म्हणून ओरडत होते. वडील नातेवाईक लोकांना सांगत होते की या गोरगरीब शेतमजुरांनी आपल्या शेतात प्रामाणिक कष्ट केले म्हणून गहू हरभरा इतर पिकं सोन्यासारखे आले, आपण त्याना लग्नात बुंदीचे जेवण दिले नाही तर त्यांच्या कष्ट व मेहनतीमुळे पीकपाणी सोन्यासारखे आले म्हणून आपण एकुलत्या एक मुलीच्या लग्नात बुंदीची पंगत देऊ शकलो. लग्नात खर्च जरी जास्त झाला असला तरी गोरगरीब लोकाना बुंदीची पंगत देऊ शकल्यामुळे वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान होते.
लग्नकार्यात श्रीमंत लोक,राजकारणी नेते यांच्या जेवणावर विशेष लक्ष दिले जाते याउलट गरीब नातेवाईक किंवा गावकरी यांच्याकडे त्यामानाने फारसे लक्ष दिले जात नाही असे चित्र बऱ्याच वेळा दिसते. खरं म्हणजे लग्नासारख्या मंगलप्रसंगी उपाशी लोकांना अन्नदान करणे यातच खरे पुण्य. लग्नकार्यात अन्न वाया न घालता व त्याचा उपयोग भुकेल्या लोकांसाठी करावा ही आपल्या सर्वांकडून अपेक्षा.
दिलीप नारायणराव डाळीमकर