गुजरात एटीएसच्या चार महिला पोलिस अधिकाऱ्यांनी एक अशी धडाकेबाज कामगिरी केली आहे जी बघून तुम्हीही म्हणाल महिला अधिकारी पण कशातच कमी नाहीत. या चार महिला अधिकाऱ्यांनी बोटादच्या घनदाट जंगलात घुसून १५ हत्यांचा आरोप असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गुजरात एटीएसला बोटादच्या जंगलात काही अवैध हालचाली होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुजरात एटीएसचे डीआयजी हिमांशु शुक्ला यांनी एक टीम तयार केली. त्यामध्ये 4 महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. या टीमने शनिवारी रात्री बोटाद जंगलामध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यानंतर या महिला अधिकाऱ्यांनी चोख कामगिरी बजावत कुप्रसिद्ध डॉन जुसब अलारखा सांध याला अटक केली.
जसुबला पकडण्यासाठी या अधिकाऱ्यांनी जंगलात मध्यरात्री पायी चालत जाऊन या गुन्हेगाराला घेरले. गुन्हा केल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी सांध जंगलात लपत असे. जसुबवर अनेक हत्यांचा आरोप आहे. जुनागढ पोलीस ठाण्यात जसुब अलारखाविरोधात १५ हत्या आणि खंडणीचे आरोप आहेत. जसुब अल्लाराखाला पकडणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. त्यामुळे या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या या महिला पोलिसांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जुसब अलारखाला याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी तीन महिन्यांपासून प्लॅनिंग केलं होतं. बोटाद जंगलात तो लपला असल्याची माहिती एटीएसचे जिग्नेश अग्रावत यांना मिळाल्यानंतर हि टीम बनवण्यात आली. अरुणाबेन गामित, नितमिका गोहिल, शकुंतलाबेन आणि जिग्नेश अग्रावत यांच्या पथकाकडे ही कामगिरी सोपवण्यात आली अशी माहिती एटीएसच्या सदस्य संतोकबेन ऑडेदरा यांनी दिली.
संतोकबेन यांनी सांगितले, गुप्तहेराने सांगितलेल्या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी दीड किमी पायी जावे लागले. कारण, गाडी घेऊन जाणे उपयोगाचे नव्हते. तरी पोलिस पाळतीवर असल्याचे आरोपीला समजले. आम्ही तो लपलेल्या भागात रात्रभर दबा धरून बसलो. सकाळी तो बाहेर पडण्याची वाट पाहत होतो. तो बाहेर पडताच त्याला पकडले. या चार महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कामगिरीस सलाम.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.