कालच जागतिक साक्षरता दिन झाला. भारतात सावित्रीबाई फुलेंनी सनातन्यांच्या दगड धोंडे, शेण चिखलाचा मारा झेलत स्त्रियांना शिक्षण दिले. त्यांनी त्यावेळी तो त्रास सहन केला नास्ता तर भारतात महिला शिक्षणाची सुरुवात व्हायला अनेक वर्ष वाट पाहावी लागली असती.
कदाचित महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसल्या नसत्या. एका बाजूला हे चित्र असतानाच महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात याच्या उलट परिस्थिती आहे. स्त्री शिक्षण खऱ्या अर्थाने महिलांमध्ये पोहोचले आहे का नाही आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल.
३८ वर्षांची महिला २१ वेळा बाळंत
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील लंकाबाई खरात या भटक्या समाजातील महिला शहराबाहेर एका पालावर राहतात. ३८ वर्षांच्या लंकाबाई २१व्यांदा अपत्याला जन्म देणार आहेत. त्यांची पूर्वीची २० बाळंतपणे घरीच झाली असून त्यांना ९ मुली आणि २ मुले आहेत.
या अगोदर डिलिव्हरीनंतर त्यांची ९ अपत्य दगावली होती. जोखमीची माता म्हणून आरोग्य विभागाने त्यांना राहत्या पालावर जाऊन सरकारी दवाखान्यात आणल्यानंतर तपासणी आणि चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली.
लंकाबाई या भंगार गोळा करून तर त्यांचे पती राजेभाऊ खरात हे गाणी म्हणून मिळालेल्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सरकारी नोंदीप्रमाणे लंकाबाईंची १७ बाळंतपणे झाल्याची नोंद आहे, मात्र त्यांनी आपले हे २१वे बाळंतपण असल्याचे सांगितले.
अपत्याला जन्म द्यायचा म्हणजे साधी गोष्ट नाही. बाळंतपणाच्या कळा सोसणाऱ्या आईलाच त्याचा त्रास माहित असतो. बाळंतपणानंतर महिलांमध्ये अशक्तपणा येतो. लंकाबाईंनी आतापर्यंत २० बाळंतपणे कशी केली असतील. भंगार गोळा करत आपल्या अशक्तपणावर कशी मात केली असेल हा विचारच करवत नाही.
आपल्या समाजात असेही लोक आहेत. एका बाजूला सुशिक्षित बेरोजगार, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणाचा संपूर्ण अभाव असे आजचे चित्र आहे. कुटुंब नियोजन, महिला आरोग्य खाते कमी पडतंय का समाजाचेच अज्ञान म्हणायचे तेच कळत नाही…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.