काही लोकांसाठी चहा जीव की प्राण असतो. दिवसभरात अनेक वेळेस चहा पिण्याची अनेक लोकांना सवय असते. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी संध्याकाळी आणि सकाळी उठल्यानंतर चहा पिऊन दिवसाची सुरुवात करणारे चहाप्रेमी आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच पाहिले असतील अथवा आपल्या कुटुंबातच देखील अशी एखादी व्यक्ती अनुभवली असेल.
काही लोकांना चहाबरोबर चटपटीत अथवा गोड खायला लागत, काही जण चहात बिस्कीट, खारी, टोस्ट असे पदार्थ आवडीने खातात. काहीजण तर समोसा किंवा नाश्ता देखील चहासोबतच करतात.
चहासोबत काही ठराविक गोष्टींचं सेवन केल्याने आपण आजारपणाला नकळत निमंत्रण देत असतो. चहाबरोबर काही गोष्टी खाल्यामुळे आपल्याला पोटदुखीचा सुद्धा त्रास होत असतो. त्याचबरोबर अपचन, ऍसिडिटीची समस्या देखील जाणवत असते. चहाबरोबर खालील गोष्टी खाणे आपण टाळले तर नक्कीच आपल्याला लाभ होऊ शकतो आणि आपले आरोग्य देखील चांगले राहू शकते.
बेसन पिठाचे पदार्थ
बरेचसे स्नॅक्सचे प्रकार बेसन पिठा पासून बनलेले असतात . शिवाय काहींना चहाबरोबर वडापाव , समोसे ,भजी खायलाही आवडतात . पण , बेसन पिठापासून बनविलेले कोणतेही पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत . बेसन पिठापासून बनवलेला पदार्थ चहाबरोबर खाल्याने त्याची पौष्टिकता संपते आणि अपचनासारखा त्रासही होऊ शकतो .
आंबट पदार्थ टाळा
काहींना चहामध्ये लिंबू पिळून म्हणजेच लेमन टी प्यायला आवडते . परंतु चहात जास्त लिंबू पिळल्यास त्यानेही ऍसिडिटी , अपचन आणि गॅसचा त्रास होतो . त्यामुळे चहा अथवा लेमन टी पिताना लिंबू कमी वापरावा आणि चहाबरोबर इतर आंबट पदार्थ खाऊ नयेत .
हळद घातलेले पदार्थ
चहा प्यायल्यावर लगेचच हळद असलेले पदार्थ खाऊ नयेत. चहा आणि हळद यांच्यातील रासायनिक घटक यांची रिऍक्शन झाल्यास पोटाला त्रास होतो . तसेच सॅलड, मोड आलेली कडधान्य, उकडलेलं अंड असे पदार्थ चहाबरोबर खाऊ नयेत . कच्चे पदार्थ चहाबरोबर खाल्ल्यास आरोग्य आणि पोटाला नुकसान होतं .