ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू अँड्र्यू सायमंड याचे संपूर्ण क्रिकेट करिअरच नाट्यमय घडामोडींनी भरलेले आहे. ९ जून १९७५ रोजी जन्मलेल्या हा खेळाडू २००३ आणि २००७ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग राहिला आहे. तसा सायमंड जन्माने वेस्ट इंडिजचा. तीन महिन्याचा असताना त्याला दत्तक घेतले गेले. त्यानंतर त्याचे पालक ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले. सुरुवातीच्या काळात सायमंड इंग्लंडच्या संघाकडून खेळण्यासाठी पात्र ठरला होता, परंतु त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
सायमंडने १९९८ साली ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघात पदार्पण केले असले तरी त्याला नंतर संघात स्थान मिळाले नाही. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत शेन वॉटसन जखमी असल्याने त्याला स्थान मिळाले. २००६ साली ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याला पुरस्कार मिळणार होता, पण बांगलादेशविरुद्धच्या एका सामन्यात रात्री उशिरापर्यंत दारु पिल्याने त्याचे निलंबन झाले आणि त्याचा पुरस्कारही गेला. वर्षभर बाहेर राहिल्यानंतर तो पुन्हा विश्वचषकावेळी संघात आला. त्यानंतर सायमंड आणि वाद हे जणू काही समीकरणच बनून गेले.
हरभजन सोबतच्या वादानंतर अँड्र्यू सायमंडचे क्रिकेट करिअरच संपले
२००८ साली क्रिकेट विश्वाला ढवळून काढणारे मंकीगेट प्रकरण घडले. सिडनी येथील कसोटीदरम्यान पंचांनी जवळपास ६-७ निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने दिले. सायमंड बाद असतानाही त्याला नॉटआऊट दिले. भारतीय संघ खेळायला उतरल्यावर मात्र पंचांनी भारताच्या विरोधात निर्णय दिले. यामुळे भारतीय खेळाडू चिडले.होते. हरभजन सिंग बॅटिंगला आला असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्लेजिंग सुरु केले.
त्यावेळी हरभजन आणि सायमंड यांच्यात बाचाबाची झाली. हरभजनने वर्णभेदी शेरेबाजी करत आपल्याला माकड संबोधल्याचा आरोप सायमंडने केला. हरभजनने मात्र हा आरोप फेटाळला. परंतु सामनाधिकारी माईक प्रॉक्टर यांनी मात्र हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घातली. त्यावेळी बीसीसीआयने हरभजनची पाठराखण करत प्रॉक्टर यांच्या निर्णयाचा निषेध केला आणि दौरा अर्ध्यावर सोडून देण्याची धमकी दिली.
त्यानंतर एक समिती बनवून त्यापुढे सुनावणी घेण्यात आली. सायमंडच्या बाजूने रिकी पॉन्टिंग आणि मॅथ्यू हेडन उतरले तर हरभजनाच्या बाजून सचिन तेंडुलकर उतरला. सचिनची साक्ष यात महत्वाची ठरली. त्यानंतर हरभजनवरील सामनाबंदीची कारवाई रद्द झाली. परंतु या घटनेनंतर सायमंडच्या वागण्यात खूप बदल झाला. त्याच्या खेळावर त्याचा परिणाम झाला आणि पुढच्याच वर्षी सायमंड नावाचा ऑलराउंडर खेळाडू क्रिकेटच्या मैदानावरुन निवृत्त झाला.