“रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत बसला होता” हा वाक्प्रचार आपल्यापैकी जवळपास सर्वांनी कुठे ना कुठे वाचला असेल किंवा ऐकला असेल. एखादी वाईट घटना घडत असताना त्याठिकाणच्या शासनकर्त्याचे त्याऐवजी दुसरीकडेच कुठे लक्ष असेल तर अशा शासनकर्त्यासाठी हा वाक्प्रचार जगभर सर्वत्र वापरला जातो. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक मृत्युमुखी पडत असताना प्रधानमंत्री पश्चिम बंगालच्या निवडणुकांत व्यस्त असल्याचे पाहून विरोधकांनी त्यांच्यासाठी हा वाक्प्रचार वापरला होता.
कोण होता हा निरो आणि हा वाक्प्रचार कसा जन्माला आला ?
निरो हा रोमन साम्राज्याचा पाचवा राजा होता. इसवी सन ५४ मध्ये तो रोमच्या गादीवर आला. सुरुवातीच्या काळात निरोवर त्याच्या आईचा प्रभाव होता, पण नंतर निरो इतका विक्षिप्त बनला की त्याने आपल्या आईलाच ठार केले. पुढे त्याने बायकोलाही ठार केले आणि त्याला परस्त्रीसंग करण्याचे व्यसन जडले. पुढे पुढे तर तरुण पुरुष देखील त्याच्या अवतीभवती दिसू लागले. यातूनच त्याने चक्क स्पोरस नावाच्या एका पुरुषाशी लग्न केले.
इसवी सन ६४ मध्ये निरोच्या साम्राज्याला १० वर्षे पूर्ण झाली होती. रोममधील सर्कस मॅक्सिमम क्रीडांगणावर लोकांच्या मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. अचानक त्या ठिकाणच्या दुकानांना आग लागली. या आगीत अर्ध्यापेक्षा अधिक शहर जळून भस्मसात झाले. ज्यावेळी आगीत शहर जळत होते त्यावेळी सम्राट निरो त्याच्या बाल्कनीत फिडेल नावाचे वाद्य वाजवत ही आग पाहत बसला होता. पुढे पुढे नीरोचे जुलूम आणि व्यभिचार वाढतच गेले. निरोच्या या निष्क्रियतेमुळे रोमचे सिनेट त्याच्या विरोधात गेले. त्यांनी निरोला देहदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेच्या भीतीने नीरोने ९ जून ६८ रोजी आत्महत्या केली.
“रोम जळत असताना…” या वाक्प्रचाराच्या मदतीने चक्क एक सॉफ्टवेअर तयार झालंय
इतिहासामध्ये “When ROME was burning, Nero was playing Fiddle” हे वाक्य इतके गाजले की जगभर त्याचा वाक्प्रचार म्हणून उपयोग होऊ लागला. जर्मन भाषेत ROME चे स्पेल्लिंग Rom एवढेच लिहले जाते. जर्मनीमधील रिचर्ड लेसर याने सीडी, डीव्हीडी बर्नचे सॉफ्टवेअर बनवणारी एक कंपनी काढली. २००५ मध्ये त्याच्या डोक्यात अचानक एक आयडिया आली. कॉम्प्युटरमध्ये Ram आणि Rom नावाचा प्रकार असतो. तसेच CD/DVD/ROM बर्निंग नावाचाही एक प्रकार असतो. रिचर्डने इतिहासातील रोम बर्निंगचा संबंध त्याच्या CD/DVD/ROM बर्निंग सॉफ्टवेअरशी जोडला आणि २००५ मध्ये आपल्या सॉफ्टवेअरला “निरो बर्निंग रोम” असे नाव दिले. त्या सॉफ्टवेअरचा लोगोही रोमच्या चौकातील जळणाऱ्या कोलोझियमचा घेतला. इतिहासातील निरोच्या वाक्प्रचारावरुन आताच्या संगणक युगात एक सॉफ्टवेअर नावारुपाला आलं.