मुंबईचे अख्खे अंडरवर्ल्ड जमादार बापू लक्ष्मण लामखडेंचे नाव ऐकताच थराथरा कापायचे

बॉलिवूडच्या चित्रपटांमधून दाखवले जाते की १९६० ते १६७० हे दशक म्हणजे मुंबईच्या अंडरवर्ल्डचा सुवर्ण काळ होता. ह्याच काळात मुंबईमध्ये दारु , मटका, स्मगलिंगसारख्या अवैध धंद्यातील गुन्हेगारांचा उदय झाला आणि त्यांनी मुंबईला वेठीस धरले. परंतु हे सगळे म्हणजे अंडरवर्ल्डला ग्लोरिफाय करण्यासाठी केलेला उपद्व्याप होता. मुळात मुंबईच्या कस्टम विभागात अशी एक तोफ धडाडत होती, जिचा आवाज ऐकताच मुंबईच्या सगळ्या स्मगलर्स भाई लोकांच्या उरात धडकी भरायची. त्या तोफेचे नाव म्हणजे जमादार बापू लक्ष्मण लामखडे.

दिनांक २ जुलै १९२२ रोजी महाराष्ट्राच्या जुन्नर तालुक्यातील मंगळूर-पारगाव या खेडेगावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बापू लामखेडेंचे वडील प्लेगच्या साथीत वारले. त्यांचा थोरला भाऊ मुंबईच्या गोदीत काम करायचा तर बापू शेतामध्ये शेळ्या चारुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. थोडासा मोठा झाल्यानंतर बापूने देखील मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन मुंबईच्या गोदीची वाट धरली. तीन-चार वर्षे छोटी मोठी काबाडकष्टाची कामे करुन १९४४ साली वयाच्या २२ व्या वर्षी बापू मुंबई कस्टम्स मध्ये शिपायाच्या पदावर भरती झाले.

बापूंबद्दल काय सांगावे ? बापू म्हणजे मुंबईच्या कस्टम विभागातील बहिर्जी नाईकच ! बापू म्हणजे इतके जबरदस्त रसायन होते की भारतीय कस्टम्स विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सरकारी पुस्तिकेमध्ये बापूजवळ अतींद्रिय शक्ती असल्याची नोंद करण्यात आली आहे.

२७ जानेवारी २०१७ रोजी जागतिक कस्टम्स संघटनेच्या व्यासपीठावर बापूला “कोहिनूर ऑफ इंडियन कस्टम्स” ह्या बहुमानाने गौरवण्यात आलंय, यावरुन तुम्ही समजून जा बापू म्हणजे कशी व्यक्ती असेल ? विशेष म्हणेज बापू हे वारकरी होते. आपली सायकल आणि खबऱ्यांचे जाळे हे बापूंचे भांडवल !

बापूंनी आपल्या ३४ वर्षांच्या कारकिर्दीत स्मगलिंगचा इतका माल पकडला की आजच्या हिशेबाने त्याची किंमत अब्जावधी रुपयांमध्ये होईल. त्यांच्या अनेक गाजलेल्या कामगिऱ्यांपैकी एक म्हणजे २९ जुलै १९५७ रोजी व्हिक्टोरिया डॉकमध्ये तीन चीनी खलाशांकडून जप्त केलेले ३०० तोळे सोने ! ते सोने त्यांनी आपल्या गुप्तांगात लपवले होते. कुठल्याही खबऱ्याची मदत न घेता केवळ आपल्या तीक्ष्ण निरीक्षणांच्या जोरावर बापूने ते स्मगलर्स पकडले होते.

आपल्या या कामगिरीने बापूने त्या काळात सिंगापूर, हॉंगकॉंग पर्यंतच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून मुंबईच्या स्मगलिंग विश्वात बापूच्या नावाची दहशत पसरली होती. त्यांना दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मुंबईच्या कस्टम विभागालाही बापूंच्या माध्यमातून पहिल्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.