एमपीएससी आणि यूपीएससी या दोन परीक्षा राज्य आणि देश पातळीवर सर्वात अवघड समजल्या जातात. या दोन्ही परीक्षा देणाऱ्यांमध्ये धैर्य, जिद्द आणि चिकाटी असलीच पाहिजे. अन्यथा या दोन्ही मायाजाल असणाऱ्या परीक्षांमध्ये अपयश आल्यास विद्यार्थी मानसिकरित्या पूर्णपणे खचून जाऊ शकतो. अनेक जण पहिल्या नाही तर दुसऱ्या, दुसऱ्या नाही तर तिसऱ्या, तिसऱ्या नाही तर चौथ्या प्रयत्नात ह्या परीक्षा उत्तीर्ण होत असतात.
अशीच प्रेरणादायी कहाणी आहे आयएएस नम्रता जैन यांची. नम्रता जैन मूळची बस्तर दंतेवाडा येथील आहे. नम्रताचे सुरुवातीचे शिक्षण याच परिसरातील शाळेमधून झाले. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दुर्ग येथे प्रवेश घेतला. याठिकाणी तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर यूपीएससी (संघ लोकसेवा आयोग) ची तयारी सुरू केली.
पहिल्यांदा जेव्हा नम्रताने यूपीएससी परीक्षा दिली, तेव्हा तिला अपयशाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा अपयश आल्यानंतर माणूस अनेक वेळा मानसिकरित्या खचून जातो. मात्र नम्रताने पुन्हा अभ्यास सुरु केला. दुसऱ्या प्रयत्नात ती यूपीएससी पास झाली आणि ९० वा रँक तिला मिळाला. या रँकनुसार तिला आयपीएस हे पद मिळणार होते. मात्र तिला आयएएस बनण्याचीच इच्छा होती.
तिने तिसऱ्यांदा यूपीएससी देण्याचे ठरवले आणि अपार मेहनत घेतली. तिसऱ्या प्रयत्नात तिने चांगली रँक मिळवली आणि आयएएस पदाचे आपले स्वप्न पूर्ण केले. आयएएस झाल्यानंतर नम्रताला एका मुलाखतीदरम्यान यूपीएससी उमेदवारांना काय सल्ला द्याल ? असे विचारण्यात आले. यावर नम्रता म्हणाल्या की, माझा प्रवास लक्षात घेता मी इतकंच सांगते, की यूपीएससी देणाऱ्या उमेदवारांनी कायम निराशेपासून दूर राहावे.
आपल्याकडे कमी संसाधने आहेत किंवा आपण घेतलेले शिक्षण हे कमी दर्जाचे आहे असे कधीही समजू नये. कठीण काळात जो सर्व गोष्टी योग्यरीत्या जुळवून आणतो तोच या यूपीएससीच्या लढाईत जिंकतो असा मोलाचा सल्ला नम्रता जैन यांनी उमेदवारांना दिला आहे.