राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला १० जून २०२० रोजी २१ वर्षे पूर्ण होत आहेत. कुठलाही नवीन पक्ष स्थापन झाल्यानंतर तो रुजायला वाढायला वेळ जातो. परंतु राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह घड्याळ आहे, त्या घड्याळाप्रमाणेच राष्ट्रवादीला रुजायला वेळ लागला नाही. स्थापनेच्या वेळीच समाजवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरण झाले. स्थापनेच्या तीनच महिन्यात विधानसभा निवडणूक झाल्या आणि राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या. पण पवारांचा करिश्मा यांच्यापेक्षाही पुढचा होता हे सांगणारे एक उदाहरण आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
हा किस्सा आहे २००० सालच्या विधानपरिषद निवडणुकीचा. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. त्यावेळी नाशिक जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडे असणाऱ्या मतदारांची संख्या फक्त १ होती. राष्ट्रवादीचा केवळ एकच नगरसेवक होता. या एका मतदाराच्या भरवशावर राष्ट्रवादी काँग्रेसने देविदास पिंगळे हा नवखा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला.
निवडणूक लागली. त्यावेळी नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व होते. त्यामुळे शिवसेनेने महापौर असणाऱ्या वसंतराव गितेंनाच उमेदवारी दिली. दुसरीकडे काँग्रेसनेही नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या गोपाळराव गुळवेंना निवडणुकीत उतरवले. त्यामानाने देवीदास पिंगळे अगदीच नवखे होते.
पण शरद पवारांचा डाव अजून बाकी होता. १९८५ च्या निवडणुकीत पुलोदचा प्रयोग करुन नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व १४ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांबद्दल नाशिककरांमध्ये एक वेगळेच आकर्षण होते. विधानपरिषद निवडणुकीसाठी भेटीगाठी सुरु झाल्या. पिंगळेंनी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. निवडणूक झाली. अंतिम निकाल हाती आला.
त्यात काँग्रेस १०१ वर अडखळली होती, शिवसेना-भाजप युतीला २०३ मते मिळाली आणि निवडणुकीत केवळ एक मतदार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तब्बल २३४ मते मिळवत विजय मिळवला. देविदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे पहिले आमदार झाले. या सगळ्या विजयामागे पवारांची अदृश्य ताकत होती.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.