आयएएस आणि आयपीएस या पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा ही अत्यंत कठीण मानली जाते. त्यातच जर आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करून या परीक्षेची तयारी करत असू तर मग या परीक्षेत यश मिळवणे अत्यंत कठीण आहे. कारण साधारण उमेदवार देखील यूपीएससी परीक्षेसाठी किमान १० ते १२ तास अभ्यास करत असतो.
आयएएस अधिकारी शिवजीत भारती यांनी मात्र नोकरी करून यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले होते. शिवजीत भारती या कुटुंबासहित हरियाणामधील जयसिंगपुरा गावात राहात होत्या. शिवजीतचे वडील हे सकाळीच पहाटे उठत असत आणि वृत्तपत्र वितरणकरण्यासाठी बाहेर पडत असत. ते वर्षभरात फक्त ४च सुट्ट्या घेत असत.
शिवजीतची आई शारदा सैनी अंगणवाडीत काम करत असत. शिवजीत घरच्यांचे आर्थिक उत्पन्न हे कमी असल्याने शिक्षणाच्या बाबतीत जास्तीचा खर्च त्यांना परवडत नसे. मात्र तिने अत्यंत चिकाटीने अभ्यास आणि कष्ट सुरु ठेवले. तिने २०१५ साली चंदीगड मधील पंजाब विद्यापीठातून मॅथ्स ऑनर्ससह उच्चपदवीचे शिक्षण पूर्ण केले. याकाळात आर्थिक खर्च भागवण्यासाठी ती शाळकरी मुलांच्या घरी जाऊन शिकवणी घेत असे.
स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करत असताना शिवजीतच्या घरच्यांनी तिच्या लग्नसाठी तिच्यावर दबाव आणला होता. मात्र शिवजीतने या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आपल्या तयारीवर भर दिला. या दरम्यान तिला एचसीएस (कार्यकारी) परीक्षा देण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच प्रयत्नात तिने ही परीक्षाही उत्तीर्ण केली.
त्यानंतर शिवजीतने नोकरी करताना आपला अभ्यास सुरु ठेवला. आणि लागलीच तिने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. काम करत असताना अभ्यासात सातत्य ठेवल्यानेच तिला यश मिळाले.
शिवजीत सांगते की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही करायचे असेल तर यशासाठी कठोर मेहनत नेहमीच आवश्यक असते आणि यश सहज मिळवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय किंवा शॉर्टकट नाही. इच्छाशक्ती असेल तर छोट्या गावात राहूनही बरेच काही साध्य करता येते हे शिवजीतच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.