कुत्र्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेविषयी आपल्याला माहित आहे. त्यांची हुंगण्याची शक्ती सामान्य माणसांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त असते. त्यामुळेच त्यांचा उपयोग बॉंम्बविरोधी पथकाच्या ताफ्यासोबतच पोलीस आणि आर्मीच्या अनेक विभागांमध्ये केला जातो.
आपल्या जबरदस्त हुंगण्याच्या शक्तीमुळे हा प्राणी अत्यंत कमी वेळात पोलिसांना मुख्य हॉटस्पॉटच्या ठिकाणी घेऊन जातो, ज्याठिकाणी गुन्हा घडला आहे किंवा घडणार आहे. हे झालं कुत्र्याचं, पण आपण कधी कुठला उंदीर कुठल्या विशेष टीमचा भाग असल्याचे ऐकले नसेल.
पण खरंय ! असा एक उंदीर आहे, ज्याच्या हुंगण्याची शक्ती प्रचंड आहे. मगावा असे त्या उंदराचे नाव आहे. कंबोडियामधील हा उंदीर आपल्या हुंगण्याच्या पराक्रमामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मागच्या काही वर्षे हा उंदीर एका विशेष टीमचा हिस्सा होता, आता तो सेवेतून निवृत्त होत आहे. आपल्या कार्यकाळात या उंदराने ९९ पेक्षा अधिक वेळा सुरुंग शोधून काढले आहेत, ज्यामुळे हजारो लोकांचा जीव वाचला आहे.
आपल्या माहितीसाठी, हा उंदीर आफ्रिकन वंशाचा आहे. या उंदराच्या हुंगण्याच्या शक्तीपुढे महागड्या मशिन्स देखील कस्पटासमान आहेत. या उंदराचे वय ७ वर्षे आहे. काही वर्षांपूर्वी कम्बोडियामध्ये जमिनीखाली पेरलेले सुरुंग शोधण्यासाठी या उंदराला प्रशिक्षण देण्यात आले होते. काही काळापूर्वी ब्रिटनमधील एका चॅरिटी संस्थेने मगावाला त्याच्या पराक्रमाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. आता हा उंदीर सेवानिवृत्त झाला आहे. सोशल मीडियावर या उंदराची चर्चा सुरु झाली आहे.