भारताच्या इतिहासात १९६२, १९७१ आणि १९७५ या साली आणीबाणी घोषित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १९६२ च्या आणीबाणीला भारत-चीन युद्धाचा आणि १९७१ च्या आणीबाणीला भारत-पाकिस्तान युद्धाचा संदर्भ होता. परंतु २५ जून १९७५ रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीसाठी देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका असल्याचे कारण देण्यात आले होते. १९७५-७७ यादरम्यान सुमारे २१ महिने ही आणीबाणी लागू होती. पण उगाचच इंदिरा गांधींच्या मनात आलं म्हणून त्यांनी ही आणीबाणी लागू केली असे झाले नव्हते. त्यामागे काही कारणे होती. ती कारणे आपण पाहणार आहोत.
१) १९७० च्या दशकात इस्राईल-अरब यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर प्रचंड वाढल्याने भारतात महागाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच १९७१ सालच्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. सोबतच जिनिव्हा करारानुसार बांग्लादेशचे १ कोटी निर्वासित आणि पाकिस्तानचे ९० हजार शरणार्थी सैनिक यांच्या मूलभूत गरज भागवण्याची जबाबदारी भारतावर येऊन पडली. पाठोपाठ १९७२ साली देशात प्रचंड मोठा दुष्काळ पडल्याने देश सर्व बाजूंनी आर्थिक संकटात सापडला होता. महागाईमुळे देशात तीव्र आंदोलनांना सुरुवात झाली.
२) १९७१ सालच्या रायबरेली लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला असा आरोप पराभूत उमेदवार राजनारायण यांनी केला होता. त्यासाठी ते कोर्टात गेले. त्या प्रकरणाचा निकाल १२ जून १९७५ साली लागून कोर्टाने इंदिरा गांधींना अपात्र ठरवले. त्यानंतर इंदिरा गांधी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयात इंदिरा गांधींना प्रधानमंत्री पद वाचले, पण त्यांना संसदेचे सदस्य म्हणून राहण्यास बंदी घातली.
३) तत्पूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन गुजरातमधील काँग्रेस सरकार बरखास्त झाले आणि तिथे निवडणुका लागल्या. या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. या निवडणुकीचाही निकाल १२ जून १९७५ रोजीच लागला. या विजयाने इंदिरा गांधींचे स्पर्धक असणाऱ्या मोरारजी देसाईंची राजकारणातील ताकत वाढली होती. एकाच दिवशी इंदिरा गांधींना दोन धक्के बसले. या दोन्ही घटनांमुळे इंदिरा गांधींना आपले आसन डळमळीत वाटायला लागले होते.
४) १९७२ च्या दुष्काळानंतर देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. सरकारला जनतेपर्यंत रेशनिंगचे अन्नधान्य पोहोचवण्यासाठी रेलवेची फार गरज होती. परंतु जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वेचा अभूतपूर्व संप घडवून आणला. त्यामुळे परिस्थिती चिघळली. सरकारने तीन आठवड्यात हा संप मोडून काढला. परंतु इंदिरा गांधीविरोधात हळूहळू जनमत तयार व्हायला लागले.
५) रायबरेलीच्या निकालानंतर जयप्रकाश नारायण यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी इंदिरा गांधी सरकारसोबत संपूर्ण असहकार तत्व पाळण्याचे आवाहन केले. शाळा महाविद्यालय बंद पाडण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले. या आवाहनामुळे लोक पेटून उठले. सरकारला काम करणे मुश्किल झाले. त्यावेळी इंदिरा गांधींसमोर दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्याच्या हालचाली त्यांनी सुरु केल्या.